दुतोंड्या मारुतीची भव्य, आकर्षक मूर्ती हे नाशिकचे भूषण आहे. गोदावरीच्या पुराचे मोजमाप ठरविणारी दोन बाजूंना असलेली अकरा फूट उंचीची ही मूर्ती मूळची नाही. पूर्वी या मारुतीची मूर्ती साडेपाच फुट उंचीची होती. १९३९ सालच्या नाशिकच्या महापुरात नारोशंकराच्या घंटेला पाणी लागले होते व सरकारवाड्याच्या तेरा पायऱ्या पाण्याखाली गेल्या होत्या. त्या पुरात या मारुतीच्या मूर्तीलाही हानी पोहोचली. त्यानंतर तेथील व्यायामप्रेमी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी ठरविले, की येथे मारुतीची उंच मूर्ती तयार करून बसवायची.
त्याकाळी नाशिक शहरात पाथरवट समाज मूर्ती कामात पारंगत समजला जायचा. त्यामुळे आबाजी दादाजी भोईर यांना मूर्ती बनविण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी मूर्ती बनविण्याचे कबूल केले. परंतु ११ फूट दगड आणून देण्याची विनंती केली. मात्र पुढे व्यवहाराची बोलणी फिसकटल्याने नाशिकचेच शंकर बलदेव परदेशी यांना बोलावण्यात आले, ते सिमेंटच्या मूर्ती बनविण्यात निष्णात होते. परदेशी लहरी असल्याने त्यांनी या कामाला विलंब लावला, त्यामुळे त्यांच्याकडून हे काम काढून नथुराम दादाजी भोईर यांना देण्यात आले. त्यांनी अर्धवट राहिलेली मूर्ती पूर्ण केली.
दुतोंड्या मारुतीची पूर्वेकडची मूर्ती ही शंकर परदेशींच्या हातची व पश्चिमेकडची मूर्ती ही नथुराम भोईर यांच्या हातची आहे. ही मूर्ती पूर्ण झाल्यानंतर १९४२ मध्ये तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दुतोंड्या मारुतीचे जुन्या मूर्तीचे व आताचे फोटो.