जन्माष्टमी जवळ येताच महाराष्ट्रात दहीहंडीची तयारी सुरु होते पण नाशिककरांना वेध लागतात मुरलीधराच्या उत्सवाचे!! यमुनाकाठी लीला करणारा व्रजकुमार गोदावरीच्यातीरी कापडपेठेत मुरलीधर म्हणून मऱ्हाटमोळ्या रूपात विराजमान आहे. गोकुळाचा सावळा कान्हा इथे मात्र लख्ख गोरा आहे. शुभ्र पाषाणातील मुरलीधराचे गोरेगोमटे स्वरूप मनाला भुरळ पाडते. श्रावण कृष्ण प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या उत्सवात याची वेगवेगळ्या रूपातील पूजा बघायला नाशिककर ”दिने दिने नवम् नवम् नमामि नन्द संभवम्” म्हणत गर्दी करतात. नागपंचमीला खुद्द देवालाच या उत्सवाचे रितसर निमंत्रण दिले जाते.मंदिर धुवून पुसून लख्ख होते. मुरलीधराच्या या उत्सवासाठी सज्ज होते. पौर्णिमेचा चंद्र मावळून प्रतिपदेची पहाट उजाडते आणि हा आनंदसोहळा सुरू होतो.
गोदाकाठी कापडपेठी कृष्ण दावितो लीला हो
शुभ्र अंग हाती वेणू भासे मदनाचा पुतळा हो
रूप नवे प्रतिदिनी घेई चाले आनंदसोहळा हो
मुरलीधराचे कौतुक बघण्या भक्तांचा मेळा हो
प्रतिपदेला प्रातःकाळी पुण्याहवाचन, वीणा पूजन करून उत्सवाला सुरवात होते .पहिल्या दिवशी मुरलीधर झुल्यावर विराजमान होतात. कान्हा अगदी मजेत झोके घेत भक्तांना दर्शन देत असतो.
प्रथमदिनी मुरलीधर झुलवतो हिंदोळा हो |
माथी फेटा गळा कंठी पायी घुंगरवाळा हो |
संत योगी ऋषी मुनीजन झाले भोवती गोळा हो |
ब्रह्मानंदी लिन व्हाया हलविती सारे झुला हो ||
कधी कान्हाच्या मन मोराचा पिसारा असा फुलतो कि तो थेट मोरावर स्वारी करतो. “सुपिन्छ गुच्छ मस्तकम् , सुनाद वेणु हस्तकम्” अशा मयुरारूढ कृष्णाला पाहून भक्तांच्या मनात आंनदघन बरसले नाहीत तर नवल.
कुंजवनी करीत भ्रमण दाखवी लीला न्यारी हो |
मोरावर बैसुनी कैसे हिंडे हा गिरीधारी हो |
मोरपिसाचे गुच्छ शोभती वनमाळीच्या शिरी हो |
मयूरनृत्ये गर्जती वर्षति भक्तीमेघाच्या सरी हो ||
हिंडून या राजस नंदबाळाला फार श्रम होतात . म्हणून कधी तो थेट शेषनागावर शय्या करतो. लक्ष्मीने नाजूक हाताने त्याचे थकले पाय दाबून दिले तेव्हा कुठे स्वारी खुश होते.
क्षीरसागरी लक्ष्मीवल्लभ रमले शेषशयनी हो
आदिमाया महालक्ष्मी तोषवी पादसेवनी हो
पुढे गरुड हनुमंत मागे शेषसहस्रफणी हो
नारद तुंबर करती गायन घालती लोटांगणी हो
संकष्टी चतुर्थीला आकाशातील चंद्रकोर पाहून बाळ कृष्णाने त्याचा हट्ट धरला नसता तर नवल होतं. गणराया लगेच आपला प्रिय चंद्र कृष्णाला देतो. मग काय ? कृष्णचंद्र थेट चंद्रावर विराजमान होतो .
संकष्टीचे दिवशी कृष्ण बैसे चंद्रावरी हो |
गौर वदन शुभ्र वसन पगडी शोभे शिरी हो |
स्निग्ध लोचने रूप देखणे ताप मनीचा हारी हो |
कृष्णचंद्राचे चांदणे आता सबाह्य अभ्यंतरी हो ||
सोमवारी कृष्णाला आपल्या आराध्य शंकराचे रुद्र रूप घ्यायचे असते .पण शक्ती शिवाय शिव अपूर्ण म्हणून डाव्या अंगी उमा विराजमान होते. एकीकडून व्याघ्राम्बर, रुद्राक्ष माळा तर दुसरी कडून पैठणी, मोत्याच्या माळा अशा अर्ध नारीनटेश्वर रूपात कृष्ण!! शैव, वैष्णव, शाक्त असे सगळे प्रवाह अद्वैतात जणू लीन होतात.
शंभू ध्यातो ज्याला तो स्वये शिवरूप धारी हो
वामांगी रूप उमेचे दक्षिणेस त्रिपुरारी हो
नारीनटेश्वर रूप देखणे कैसे हे मनोहारी हो |
शैव वैष्णव भेद न उरे इथे मुक्ती चारी हो ।।
कधी मुरलीधराला थोडी गंमत करायची हुक्की येते. कृष्णाच्या दर्शनाला आलेले भक्त बघतात तर काय तिथे कृष्णाऐवजी राधा उभी असते. चापून चोपून नेसलेली काठपदराची पैठणी,पायात नाजूक नूपुरे, कटीवर मेखला, गळ्यात ठुशी, तन्मणी, चपलाहार, लक्ष्मीहार !! कपाळावर रुपयाएवढं कुंकू, माथी बिंदी आणि कंबरेपर्यंत रुळणारी वेणी ! आहाहा !! हि लावण्यखणी राधा पाहून भक्तांचे भान असे हरपते कि हा कृष्णच आहे याचा देखील विसर पडतो. “राधे राधे “ गजर करणाऱ्या वेड्या भक्तांना पाहून मुरलीधर मिश्किलपणे हसत असतो. .#विनय_उवाच
वृषभानुची लेक लाडकी वृंदावन स्वामिनी हो
वसन रेशमी माथी बिंदी शोभे कृष्णरमणी हो
पायी पैंजण वाजे रुणझुण चाले गजगामिनी हो
राधारुपी कृष्ण पाहण्या पंचप्राण नयनी हो
आपल्या या अशा भोळ्या भक्तांच्या हाकेला हा भक्तप्रिय गोविंद अगदी लगेच धावून जात असतो. गजेंद्र, ध्रुव, प्रल्हाद .. कितीतरी भक्तांनी धावा केला तेव्हा हरी गरुडावर बसून त्वरेने धावून आला होता. त्याचेच स्मरण करवण्यासाठी उत्सवात कृष्ण गरुडावर स्वारी करतो.
गरुडावर बैसले श्रीहरी आनंदली अवनी हो |
शामवर्ण हरीचा व्यापला नीलनिळ्या गगनी हो |
झळके पितांबर जैसे चमके सौदामिनी हो |
भक्त संकटी पडता श्रीहरी येई गरुडावरूनी हो ||
या सप्ताहात देवापुढे रोज कीर्तन, भजन, गायन, नृत्य, सूक्तपठण इतकंच नाही तर ढोलवादन, वेणुवादन अशा विविध सेवा सादर होतात. नाशिकरांच्या सोशल मीडिया स्टेट्स ला हमखास रोजच्या रूपाचे फोटो दिसतात. कृष्ण हा भक्तांच्या मनाचा राजा आणि जन्माष्टमी हि तर कृष्ण भक्तांसाठी पर्वणीच ! या दिवशी कृष्ण राजोपचार स्वीकारून द्वारकाधीश रूपात दर्शन देतात. सूर्य मावळून जशी जशी रात्र वाढते तस भक्तांच्या उत्साहात उधाण येते. मध्यरात्रीचे बारा वाजतात , गुलाल उधळला जातो ,शंख गुंजतात ,घंटा वाजतात ,श्रीकृष्णाचा जन्म होतो. पाळणा झुलवला जातो .सुंठवडा पंजीरीचा प्रसाद वाटला जातो .
पण हा सोहळा इथेच संपत नाही. द्वादशी पर्यंत सत्यनारायण पूजन,मुरलीधरयाग अशा विविध सेवा होतात. दशमीला मुरलीधर रथारूढ रूप घेतात. पालखीतून नगरप्रदक्षिणा करत भक्तांचे क्षेम कुशल पुसतात.
द्वादशीला मुरलीधराचे बारसे होते.अनंत नावे ,अनंत गुण असणाऱ्या या परब्रह्माचे नेमके नाव काय ठेवावे हा गहन प्रश्न असतो. कर्षयति आकर्षयति स: कृष्ण: । सगळ्यांचे चित्त आकर्षून घेणाऱ्याचे नाव कृष्ण ठेवले जाते.या दिवशी मुरलीधर गोपवेशात घोंगडी घेऊन असतात. गोपाळकाल्याने या उत्सवाची सांगता होते. नाशिकरांच्या हाताला या गोपाळकाल्याचा सुगंध पुढील वर्षभर येत राहतो.
विनय मधुकर जोशी
vinayjoshi23@gmail.com